एनआव्हीत आठ तासात होणारी कोरोना चाचणी 2 तासात करणारे टेस्टिंग किट, आयसीएमआरची परवानगी

पुणे : देशात आणि राज्यांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मर्यादित ‘टेस्ट किट’चा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. विषाणूजन्य संसर्गाची लक्षणे आणि निदान यांची टेस्ट करण्यासाठी देशात ‘टेस्टिंग फॅसिलिटी’ मर्यादित आहेत. या अडचणीवर मात करणारी कामगिरी पुण्यातील ‘मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स’ने केली आहे.


एनआयव्हीत कोरोना चाचणीसाठी ८ तास लागतात. या टेस्ट किटमध्ये मात्र दोन तासात चाचणी अहवाल मिळतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कामगिरी फक्त सहा आठवड्यांच्या विक्रमी अवधीत पूर्ण करण्यात आली आहे. आठवड्याला तब्बल एक लाख टेस्टिंग किट निर्माण करण्याची क्षमताही त्यांनी दाखवली आहे. या टेस्ट किट शासकीय तसेच खासगी रुग्णालयांना आणि प्रयोगशाळांना देण्याचा अधिकृत परवानाही केंद्र सरकारकडून ‘मायलॅब’ला देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना टेस्ट कमी वेळात आणि कमी खर्चात शक्य आहे.


‘माय लॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स’चे संस्थापक संचालक श्रीकांत पाटोळे ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले, ‘आमच्या संशोधन आणि विकास विभागातील (आर अँड डी) ३० संशोधकांच्या पथकाने अथक परिश्रम, चिकाटी, सातत्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर फक्त सहा आठवड्यांत या टेस्ट किटची निर्मिती करण्यात यश मिळवले आहे. मीनल दाखवे या आमच्या संशोधन पथकाच्या प्रमुख मार्गदर्शक आहेत. त्यांना एनआयव्हीमधील प्रशिक्षणाचा प्रदीर्घ अनुभव आहे.


टेस्ट किट प्रमाणित


कोरोना टेस्टसाठी एनआयव्ही येथेच सुविधा उपलब्ध आहे. आमच्या संशोधनाचे टप्पे इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च आणि ड्रग्ज कंट्रोल अॅथॉरिटीने संमत केले असून तसे अधिकृत प्रमाणपत्र दिले आहे.


एनआयव्हीमार्फतही आमची टेस्ट किट प्रमाणित आहे. ‘मायलॅब’ला आता टेस्ट किटच्या अधिकृत उत्पादनाचा परवाना मिळाला असून देशातील सर्व राज्यांमधून टेस्ट किटला मागणी सुरू झाली आहे.


नवी टेस्ट किट अशी



  • १२०० रुपये एका टेस्टची किंमत

  • १०० टेस्ट एका किटमध्ये शक्य

  • ३० संशोधकांच्या पथकाचे यश

  • २५ कोटींची गुंतवणूक

  • पुण्यात संशोधन, लोणावळ्यात उत्पादन

  • सरकारी व खासगी सेवाही शक्य

  • २८ राज्यांतून टेस्ट किटला मागणी

  • आठवडाभरात एक लाख किटचे उत्पादन


अशी होईल तपासणी


सध्या एनआयव्हीमधील कोरोना टेस्टसाठी प्रत्येक रुग्णामागे किमान आठ तास अवधी लागतो. संशयिताचे नमुने घेणे, तपासणे याला स्क्रीनिंग, टेस्टिंग आणि हँडलिंग म्हणतात. यासाठी बराच वेळ लागतो. एका टेस्टसाठीचा खर्च साडेचार हजार रुपये येतो. ‘मायलॅब’च्या टेस्ट किटमध्ये आम्ही हा अवधी दोन तासांवर आणण्यात यश मिळवले आहे. स्क्रीनिंग आणि आयडेंटिफिकेशन एकदमच होणार आहे. आमच्या एका टेस्टसाठी १२०० रुपये खर्च येणार आहे. अर्थात, हे सर्व आम्ही देशसेवा म्हणूनच करत आहोत. आमच्या किटमध्ये लक्षणे न दिसताही टेस्ट करण्याची सुविधा आहे. अनेकदा लक्षणे विलंबाने दिसतात, तोवर रुग्ण गंभीर झालेला असतो. हे टाळण्यासाठी लक्षणांपूर्वीच टेस्ट करून संसर्ग आहे की नाही याची खात्री करून घेता येते.